गोदावरी, ब्रह्मगिरी होणार प्लास्टिकमुक्त; २ ऑक्टोबरपासून खास अभियानाला होणार प्रारंभ

गोदावरीस प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ आणि सत्संग फाउंडेशन यांच्यातर्फे प्लास्टिकमुक्त गोदावरीचे अभियान राबविण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत दि. २ आणि ३ ऑक्टोबर रोजी गोदाकाठ आणि ब्रह्मगिरी (त्र्यंबकेश्वर) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रियायोग गुरू श्री. एम आणि विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत नमामि गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी माहिती दिली. त्यांच्यासमवेत फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, डॉ. वृषिनित सौदागर उपस्थित होते.
चिन्मय उद्गीरकर म्हणाले, की ब्रह्मगिरी ते राजमहेंद्रीदरम्यान गोदावरीचे शुद्धीकरण करण्यासाठी आराखड्यातील पहिल्या टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. दि. २ आणि ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने लोकसहभागातून प्लास्टिक कचरामुक्त नाशिक, प्लास्टिक व कचरामुक्त गोदावरी अभियान, ब्रह्मगिरीवर पूर्वीप्रमाणे जंगल वाढविणे, प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन, माती अडवा पाणी जिरवा, ब्रह्मगिरीस प्लास्टिकमुक्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. यात विविध स्वयंसेवी संस्थांचीही साथ मिळणार आहे.

अध्यक्ष राजेश पंडित म्हणाले, की २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानांतर्गत सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त नाशिक, कचरामुक्त गोदावरी’ चळवळ सुरू होईल. दुपारी ४ ते ६ या वेळेत त्र्यंबकरोडवरील इस्पॅलिअर शाळा येथे ‘माय ट्री’ संकल्पनेचा शुभारंभ होईल. सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘अध्यात्म आणि सेवा’ या विषयावर श्री. एम हे शंकराचार्य न्यास, कुर्तकोटी सभागृह येथे मार्गदर्शन करतील. दि. ३ रोजी सकाळी ७.३० ते सकाळी १० या वेळेत ब्रह्मगिरी पर्वतावर वृक्षारोपण, गवतरोपण, प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन, ‘प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी चळवळ’ प्रारंभ आदी उपक्रम राबविण्यात येतील. नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नमामि गोदा फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने