फळं आणि भाज्यांचा रस एवढं खाऊन वजन कमी होतं का?

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचालींसह आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असते. त्यामुळे बहुतेक जण योगा, जिम, चालणे यासह एक स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फॉलो करताना दिसतात. यात डाएटिशियनकडून सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, स्नॅक्स आणि रात्रीचे जेवण यात कोणते पदार्थ किती प्रमाणात खायचे याचा स्ट्रिक्ट डाएट प्लॅन ठरवून दिला जातो. पण, हल्ली वजन झटपट कमी करण्यासाठी Juice cleanse हा एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये नेहमीचे जेवण न जेवता केवळ फळं, भाज्यांचा ज्यूस प्यायला जातो. पण, Juice cleanse मुळे खरंच वजन कमी होते का, यावर संशोधकांकडून संशोधन सुरू आहे.

या प्रकाराला डिटॉक्स फूड असेही म्हटले जाते. यामुळे तुमच्या त्वचेची चमक वाढवण्यास, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. पण, Juice cleanse म्हणजे नेमकं काय? तसेच जेवणाऐवजी Juice cleanse तुमच्या आहाराचा भाग बनवणे फायदेशीर आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण इंडियन एक्सप्रेसला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊ.Juice cleanse म्हणजे नेमकं काय?

Juice cleanse म्हणजे केवळ फळं आणि भाज्यांचा ज्यूस हाच आहार. बाकी भाजी-पोळी, भात-आमटी खायचं नाही, फक्त फळं आणि भाज्यांच्या ज्यूसवर राहायचं. जेणेकरून वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल.

यावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबादमधील कामिनेनी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. एन. लक्ष्मी म्हणाल्या की, ज्यूस क्लिन्स ज्याला ज्यूस फास्ट किंवा डिटॉक्स क्लिन्स असेही म्हटले जाते. यात एका ठराविक कालावधीसाठी अन्नाचे सेवन न करता फक्त फळं आणि भाज्यांचा ज्यूस प्यायला जातो. हा कालावधी एक आठवडा, महिना किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. ज्यूस क्लिन्समुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला योग्य ऊर्जा मिळवण्यासाठी मदत होते.

वजन कमी करण्यासाठी ज्यूस क्लिन्स खरोखर फायदेशीर आहे का?

डॉ. लक्ष्मी यांच्या मते, ज्यूस क्लिन्समुळे ठराविक वेळेपुरतेच वजन नियंत्रणात राहू शकते. यात प्रामुख्याने कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने तुम्हाला वजन कायमचे नियंत्रणात ठेवणे अनेकदा अशक्य होते. ज्यूस क्लिन्समुळे शरीरात पाण्याची कमतरता, ग्लायकोजेनच्या प्रमाणात घट होते, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. पण, पुन्हा एकदा तुम्ही पूर्वीप्रमाणे पोटभर जेवण सुरू केले तर वजन वाढणार हे सहाजिकच आहे.

ज्यूस क्लिन्सच्या सुरक्षेबाबत सलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील आहारतज्ज्ञ भाविशा खुमान म्हणाले की, ज्यूस क्लिन्स आरोग्यासाठी सुरक्षित आहे का हे त्यातील विविध पोषक घटकांवर अवलंबून असते, ज्यात तुमची आरोग्य स्थिती हीदेखील महत्वाची असते.

ज्यूस क्लिन्सचे ठराविक वेळेत आणि योग्य प्रमाणात सेवन करणे योग्य आहे. पण, तज्ज्ञांच्या काही गोष्टी फॉलो करणेही महत्वाचे आहे.

पोषक घटकांची कमतरता

ज्यूस क्लिन्समध्ये सामान्यत: प्रथिने, हेल्दी फॅट आणि फायबर यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते. पण, हे घटक तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात. यामुळे सतत अशाप्रकारे ज्यूस क्लिन्स करणे म्हणजे शरीरात पोषकतत्त्वांची कमतरता निर्माण करण्यासारखे आहे. त्यामुळे यापासून खरंच फायदे मिळतात हे नीट तपासले पाहिजे.

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते

काही ज्यूस प्रकारांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. यामुळे चक्कर येणे, थकवा आणि चिडचिडेपणाची भावना येऊ शकते. तुम्हाला मधुमेह किंवा रक्तातील साखरेशी संबंधित इतर कोणते आजार असतील, तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते की कमी होतेय याचे बारकाईने निरीक्षण करा. तसेच याचे सेवन करण्याआधी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कॅलरीजची कमतरता

ज्यूस क्लिन्समध्ये अनेकदा कॅलरीजची कमरता असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. परंतु दीर्घकाळापर्यंत शरीरात कॅलरीची कमतरता निर्माण झाल्यास ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. यामुळे शरीरातील स्नायूंची कमजोरी, पोषक तत्वांची कमतरता आणि चयापचय क्रिया मंदावते.

वैयक्तिक आरोग्याचा विचार करा

मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, जठरासंबंधित आजार आणि पोषक तत्वांची कमतरता यासारख्या काही वैद्यकीय स्थितीदरम्यान ज्यूस क्लिन्स करणे धोकादायक ठरू शकते. आहारात कोणतेही महत्वाचे बदल करण्यासाठी प्रोफेशनल हेल्थकेअर आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. विशेषत: तर तुम्ही कोणत्या गंभीर आजाराचा सामना करत असाल तर हा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.

यावर डॉ. खुमान यांनी म्हटले की, काही व्यक्तींनी ज्यूस क्लिन्स करण्याचा प्रयत्न पूर्णपणे टाळला पाहिजे. यामध्ये मधुमेह , किडनी रोग, जठर रोगविषयक विकार, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा दाहक आतडी रोग (IBD) आणि काही पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या लोकांचा समावेश होतो .

तसेच गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, लहान आणि किशोरवयीन मुलं तसेच वेळी-अवेळी खाण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी ज्यूस क्लिनिंगपासून दूर राहिले पाहिजे.

यावर आरोग्य तज्ज्ञांनी सल्ला देत म्हटले की, तुम्ही ज्यूस क्लिन करण्याचा विचार करत असाल तर, आधी हेल्थकेअर प्रोफेशनल किंवा आहारतज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या. ज्यूस क्लिन्स तुमच्यासाठी सुरक्षित आहे की नाही, यामुळे तुमच्या पौष्टिक गरजा पूर्ण होऊ शकतात का, यावर तज्ज्ञ योग्य मार्गदर्शन करू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने