भारतीय आहारशास्त्रातील औषधी, बहुगुणी आणि सगळ्यांचे लाडके फळ कोणते तर ते म्हणजे आवळा ! हिवाळ्यात फळांच्या बाजारपेठेत पिटुकले आवळे दिसू लागतात. जीवनसत्त्व क ने भरपूर , चवीला तुरट -आंबट असणारा आवळा घराघरात दिसू लागतो.
आवळा म्हणजे खरंतर भारतीय आयुर्वेद आणि पाकशास्त्रच लाडकं फळं. आवळ्याचा रस, आवळ्याचा कीस , आवळ्याचे सरबत , आवळ्याचे लोणचे, पाकातील आवळा, आवळा पवार. आवळा च्यवनप्राश कोणत्याही स्वरूपात आवळा वापरता येतो आणि गुणकारी असतो.
ज्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते त्यांना आवळा खाल्ल्यामुळे अत्यंत चांगले फायदे होतात. आवळ्यातील बायो-अॅक्टिव्ह कंपाऊंड ट्रायग्लिसेराईड्सचे प्रमाण कमी करतात. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन- चांगले कोलेस्टेरॉल) चे प्रमाण वाढवतात. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (ज्याने शरीरातील रक्तवाहिन्या जाडसर होऊ शकतात असे कोलेस्टेरॉल ) त्यांचे देखील प्रमाण कमी करतात. यासोबत वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्याचे प्रमाण आवळ्यामुळे केले जाते. भविष्यात हायपर लिपिडेमिया म्हणजेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अतिरिक्त वाढण्याचा धोका कमी होतो.
आवळ्याचा आणखी एक फायदा म्हणजे आवळा हा मधुमहींसाठी अत्यंत गुणकारी आहे. आवळ्यामध्ये असणाऱ्या एलेजीक अॅसिड आणि जीवनसत्व क मुळे शरीरातील साखरेचे प्रमाण अत्यंत संतुलित प्रमाणात राहिले राखले जाते. विशेषतः अमाईलेज आणि ग्लुकोज या दोघांचे शरीरातील संतुलन राखण्यासाठी आवळा गुणकारी आहे.
आवळा जर खारवलेल्या स्वरूपात असेल किंवा फ्रोजन स्वरूपात जरी असेल तरी देखील शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण आणि ट्रायलीसराईडचे प्रमाण राखले जाते. मधुमेह असणाऱ्यांसाठी आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा अर्क हा शरीरातील ग्लुकोज आणि ट्रायग्लिसेराईडचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांचे सिरम इन्सुलिन वाढलेले असते त्यांच्यासाठी आवळ्याचा रस अत्यंत गुणकारी आहे रोज किमान 100 ते 300 मिली इतका आवळ्याचा रस नियमितपणे प्यायल्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त आवळा हा अत्यंत उपयुक्त फळ आहे. आवळ्यामुळे शरीरातील पेशींचे आरोग्य सुधारते तसेच पेशींचे आवरण देखील अत्यंत तंदुरुस्त होऊन जाते.
ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा ज्यांना हृदयरोग आहेत त्यांना हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्यासारखे फळ नाही. शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारच्या आम्लांचे असंतुलन असेल तर आवळा अत्यंत गुणकारी आहे. आवळ्यामुळे जर शरीरातील असंतुलन सुरळीत होण्यास मदत होते. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर शरीरातील इन्फ्लमेटरी मार्करचे प्रमाण जास्त असेल ( उदाहरणार्थ काही लोकांच्या शरीरामध्ये पीएनएफ नावाच्या ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टरचे प्रमाण जास्त असते) याचे प्रमाण देखील योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.
मानवी शरीरातील अनेक रोग तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर अवलंबून असतात. आवळ्यामुळे पचनाचे विकार दुरुस्त होतात. आवळ्यामध्ये असणाऱ्या सुक्ष्मणूंमुळे पोटाचे विकार कमी होतात. आतड्यातील अमलांचे संतुलन पूर्ववत होते. ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर आहे त्यांनादेखील आवळ्याचा अर्क किंवा रस अत्यंत गुणकारी आहे.
वजन कमी करण्याच्या अनेक औषधांमध्ये आवळ्याचा अर्क वापरला जातो. भुकेच्या संप्रेरकांचे संतुलन राखणे आणि शरीरातील स्निग्धांश आणि सूक्ष्मणूंचे योग्य संतुलन राखण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.
लहान मुलांचे पचन स्वास्थ्य वाढविण्यासाठी रोज १ चमचा आवळा खाण्यात असायला हवा. ज्या स्त्रियांना केस गाळण्याची समस्या आहे त्यांनी रोज १ आवळा नियमित खाल्ल्यामुळे उत्तम फरक दिसून येतो.
त्वचेच्या विकारांमध्ये आवळा अत्यंत गुणकारी आहे. आवळ्याचे साधारण ५ प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यात आकार आणि रंग यातील फरक जास्त आहे. मात्र पोषणमूल्यांचा प्रमाण पाहता आवळ्यात कर्बोदकांचे प्रमाण ७ ते ७० ग्राम इतके आहे. तंतुमय पदार्थ ३ ते १३ ग्राम , प्रथिने १ ते ३ ग्राम आणि जीवनसत्त्व क चे प्रमाण ५०० ते ७००ग्राम इतके आहे आणि वरील पोषणमूल्ये प्रत्येकी १०० ग्राम इतक्या आवळ्यांमध्ये आढळून येते.
अलीकडेच केल्या गेलेल्या एका संशाधनानुसार असे आढळून आले आहे की किमान ५०० मिलिग्रॅम इतके आवळ्याचे सेवन रोज केल्याने इन्शुलिन आणि कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण पूर्ववत हाऊ शकते . शिवाय शरीरातील अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढू शकते.
अल्झायमर्स सारख्या विकारांपासून दूर राहण्यासाठी तसेच मेंदूच्या आरोग्यासाठीदेखील आवळ्यामध्ये आवश्यक पोषणमूल्यं आहेत. अतिकाळजी कमी करणारे पॉलिफिनॉल्स आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळत असल्यामुळे मानसिक आरोग्यासाठी देखील आवळा उत्तम फळ आहे.
नेहमीच्या आहारात आवळा नियमितपणे समाविष्ट करण्यासाठी : आवळ्याचा रस, आवळा आणि मध किंवा आखा आवळा दिवसातून किमान एकदा तरी खायला हवा.
ज्यांना नुसता आवळा खाणे कठीण वाटते त्यांनी आवळा-लिंबू सरबत किंवा आवळा-लिंबू रस दिवसातून एकदा प्राशन करावा. उत्तम आयुर्वेदिक वैद्यांकडून योग्य सल्ल्याने घेतले गेलेले आवळा च्यवनप्राश देखील सध्याच्या प्रदूषित वातावरणात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.