वजन कमी करण्यासाठी वाढतोय Cozy Cardio ट्रेंड, जाणून घ्या फायदे

कामाच्या तणावाखाली अनेकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे शारीरिक हालचाल न झाल्याने वजनवाढ वेगाने होते आणि लठ्ठपणामुळे अनेक आजारही उद्भवतात. लठ्ठपणामुळे डायबिटीस आणि उच्च रक्तदाबासारखे आजार जडतात. याशिवाय लठ्ठपणामुळे लोकांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते आणि नसांमध्ये ब्लॉकेज आणि हृदयसंबंधित समस्यांचा धोकाही वाढतो.

तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका हवी असेल तर सध्या कोझी कार्डिओ ट्रेंडमध्ये आहे. यामुळे वजन नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. योबिक्स वर्कआऊटमधील फिटनेस ट्रेनर डॉ. कविता नालवा यांनी Cozy Cardio म्हणजे काय आणि याचा ट्रेंड का वाढतोय याबाबत अधिक माहिती दिली आहे.
कोझी कार्डिओ म्हणजे काय?

कोझी कार्डिओ सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये कमी प्रभाव असणारे कार्डिओवस्क्युलर व्यायाम समाविष्ट करून घेण्यात येतात उदाहरणार्थ उड्या मारणे, धावणे हे अत्यंत हळूवार गतीने करण्यात येते. कोझी कार्डिओ करण्यासाठी जास्त ताकद लागत नाही हा याचा फायदा आहे. त्यामुळे शरीराच्या अवयवांवर कमी प्रमाणात दबाव येतो आणि कार्डिओ करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो. असे करणे अत्यंत सोपे असून वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो.

घरच्या घरीही तुम्ही कोझी कार्डिओ करू शकता आणि त्यासाठी जिमला जाण्याची आवश्यकता भासत नाही. जिममध्ये येण्याजाण्याचा वेळ वाचतो. काही जणांना जिममध्ये हेव्ही वर्कआऊट करायला त्रास होतो, त्यांनी वजन नियंत्रणात राखण्यासाठी कोझी कार्डिओची मदत घ्यावी.

कोझी कार्डिओ किती प्रभावशाली?

सध्या कोझी कार्डिओ अत्यंत ट्रेंडमध्ये असून तज्ज्ञांच्या मते नियमित स्वरूपात शारीरिक हालचाल केल्याने हार्ट स्ट्रोक, हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहाता येते आणि असा व्यायाम तुमच्या मेंदूसाठीही उपयुक्त ठरतो.

१८ व्या वयापासून ते ६५ व्या वर्षापर्यंत व्यक्तींना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. काही वेळा जिममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य नसते मग अशा वेळी कोझी कार्डिओचा आधार घ्यावा जेणेकरून तुमची शारीरिक हालचाल व्यवस्थित राहाते आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

सायकलिंग

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर कोझी कार्डिओचा आधार घेणार असाल तर यामध्ये सायकलिंग करण्याचा व्यायाम तुम्ही निवडावा. दिवसातून किमान १५-२० मिनिट्स सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सायकलिंग केले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम ठरतो आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.

धावणे

तुम्हाला धावण्यासाठी बाहेर जायची गरज आहे असं नाही. कोझी कार्डिओ करताना तुम्ही घरातल्या घरात एकाच जागी धाऊ शकता. हा व्यायाम साधारण १५-२० मिनिट्स रोज सकाळी तुम्ही केल्यास, तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

ट्रे़ड मिल

आजकाल घरच्या घरी ट्रेड मिल मशीनचा उपयोग करून घेता येतो. तुमचे घर मोठे असेल आणि तुम्हाला बाहेर जिममध्ये जाऊन व्यायाम करायला जमत नसेल तर ट्रेड मिलचा पर्याय उत्तम आहे. सकाळी तुम्ही अर्धा तास जर ट्रेड मिलवर चालाल तर वजन कमी होण्यास मदत मिळते. सुरूवातील यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतर नियमित आपला कोझी कार्डिओ चालू ठेवा.

दोरीच्या उड्या

तुम्ही नियमित जर दोरीच्या उड्या मारल्या तर वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग तुम्हाला होतो. हा एक उत्तम व्यायाम असून अधिक जोर लागत नाही. तसंच दिवसातून तुम्ही किमान स्वतःसाठी अर्धा तास काढून हा व्यायाम करू शकता. कोझी कार्डिओमध्ये या व्यायामाचाही समावेश होतो.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कार्डिओशिवाय योगासनाचाही वापर करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढते आणि अतिरिक्त चरबी जाळून वजन कमी होण्यास मदत मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने