२४ तासात कधीही ३० मिनिटं मांडी घालून बसण्याचे फायदे; पाठदुखीचा त्रास असेल तर वाचा योग्य पद्धत

पाठीची दुखणी आजकाल प्रत्येक वयात होऊ लागली आहेत. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचारी वर्गापर्यंत अनेकांची जीवनशैली बैठी असल्याने सांधेदुखी ही कॉमन समस्या झाली आहे. मुख्य म्हणजे प्रश्न इतका कॉमन असूनही त्यावर उपाय हे फार खर्चिक आहेत. पाठीच्या दुखण्यावर आयुर्वेदिक उपचार करणे हे वेळखाऊ वाटत असणाऱ्यांना एर्गोनॉमिक खुर्च्या, स्टँडिंग डेस्क आणि बॅक सपोर्ट गॅझेट असे पर्याय वापरावे लागतात पण याच्या किमती प्रचंड असतात. पण आज आपण या सगळ्या दुखण्यावर व खर्चावर एक साधा सोपा रोजच्या आयुष्यात करता येणारा उपाय पाहणार आहोत. इंडियन एक्सस्प्रेसने डॉ सिद्धार्थ शाह, सल्लागार ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, एस एल रहेजा हॉस्पिटल, यांच्याशी संवाद साधून पाठीच्या दुखण्यावरील एका उपायाविषयी माहिती दिली आहे.
रोज ३० मिनिटे जमिनीवर मांडी घालून बसल्याने, पाठ, नितंब व पायांचे स्नायू ताणले जातात. यामुळे सांध्यांची लवचिकता सुधारण्यास मदत होते. हे मणक्याची नैसर्गिक वक्रता कायम ठेवण्यास मदत करते. याशिवाय चालताना सुद्धा तुमचे संतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते. ही मुद्रा तुमच्या पायाच्या व पाठीच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि रक्ताभिसरणाला सुद्धा चालना देते. यासंदर्भात अजून वैज्ञानिक अभ्यास व पुरावे समोर येणे गरजेचे आहे.

मांडी घालून बसल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे संतुलित होते?

लवचिकता वाढते: मांडी घालून बसल्याने पाठीचे, नितंब आणि पायांचे स्नायू हळूवारपणे ताणले जातात, लवचिकता सुधारते. त्यामुळे, तुमच्या दैनंदिन हालचाली सुलभ होतात आणि स्नायूंवर येणारा ताण आणि दुखापतीचा धोका कमी होतो.

शरीराची ठेवण सुधारते: मांडी घालून बसताना तुम्हाला फक्त पाठीचा कणा जास्त वाकवायचा नाहीये. यामुळे, पाठ आणि मानेचे दुखणे कमी होऊ शकते आणि एकूणच शरीराला आराम मिळू शकतो.

कोअरची शक्ती सुधारते: मांडी घालून बसल्याने पोट व शरीराचा कोअर म्हणजेच पोटाच्या स्नायूंची शक्ती वाढते.

उत्तम रक्ताभिसरण: काही पुरावे असे सूचित करतात की मांडी घालून बसणे रक्त प्रवाह सुलभ करू शकते आणि रक्ताभिसरण सुधारू शकते

आरामाचा सोपा मार्ग: मांडी घालून बसल्याने ताण- तणाव कमी होत असल्याचे म्हटले जाते यामुळे आपोआपच शरीराला आराम करत असल्याचा भास होतो.

एकाग्रता: हे आसन एकाग्रता आणि सतर्कता वाढवू शकते, ज्यामुळे मानसिक क्षमता वाढून त्याची गरज असलेल्या कामामध्ये मदत होते.

गुडघ्याला दुखापत होऊ नये किंवा फ्रॅक्चर होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?

जेव्हा तुम्ही जमिनीवर मांडी घालून बसता तेव्हा काही मिनिटांनंतर वेदना होतायत का, पायाला मुंग्या येतायत का म्हणजेच चुरचुर जाणवतेय का तपासा. अशा वेळी भिंतीचा आधार घ्या, त्याने मदत होऊ शकते.

पुराव्यावरून असे दिसून आले आहे की जमिनीवर मांडी घालून बसल्याने गुडघ्याच्या सांध्यावर अधिक लक्षणीय भार येऊ शकतो आणि दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. हे गुडघ्याला दुखापत झालेली असल्यास आणखी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे काहीही करण्यापूर्वी तुमच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन करा.

योग्यरित्या शरीराला ही सवय लावल्यास आपल्याला वर नमूद केलेले अनेक फायदे मिळू शकतात. सुरुवातीला आपण साधारण दिवसातील २० ते ३० मिनिटांचा कालावधी या स्थितीत बसण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण वेळ वाढवून शकता. स्नायूंवर येणारा ताण किंवा त्यामुळे होणाऱ्या दुखापतीचा धोका टाळण्यासाठी बसताना व उठताना काळजी घ्या व वेगाने पायाला झटका देऊ नका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने